हुक्केरी / वार्ताहर
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी हुक्केरी तालुक्यात इंदिरा कँटीन अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. काँग्रेस सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी इंदिरा कॅन्टीन योजनेची सुरुवात कर्नाटक राज्यात २०१७ मध्ये झाली होती.
शहरातील कोर्टसर्कल जवळ कँटीनची इमारत बांधण्यात आली असून सर्व प्रकारचे साहित्य आले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेली इंदिरा कॅन्टीन योजना हुक्केरी शहरात पाच वर्षांनंतरही सुरू झालेली नाही.
राज्यात आता काँग्रेसचे सरकार आहे. यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तेव्हा मंत्र्यांनी इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून गोरगरीब मजूर व भुकेलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्यास सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक व्यापारी महावीर चौगुला म्हणाले, वेगवेगळ्या गावातील शेकडो लोक दररोज न्यायालयाच्या आवारात कामासाठी येतात. मात्र नाश्त्यासाठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. के. बी. कुरबेट यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तेवर येताच राज्यातील सर्व इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहेत. मात्र हुक्केरी शहरात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात काही अडथळे आहेत का? तसेच सरकारने लाखो रुपये खर्चून बांधलेले इंदिरा कँटीन कधी सुरू होणार? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मनोहर शेंद्री, मलगौडा मगदूम, अनिल दबधुली आधी उपस्थित होते. एकंदरीत लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी हुक्केरीतील गोरगरिबांना अद्यापही इंदिरा कॅन्टीनचे भाग्य लाभलेले नाही.
0 Comments