बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव - गोवा मार्गावर चोर्ला घाटातील जांबोटी - चिखले  क्रॉसनजीक दोन अवजड वाहनांचा भीषण अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तरी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गावरून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर वाहने हटविण्यासाठी वेळ लागणार असल्याने गोव्याहून येणारी वाहने अनमोड मार्गे वळविण्यात आली आहेत.

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन अवजड वाहनांची विचित्र पद्धतीने टक्कर झाल्याने चोर्ला मार्गावरील गोवा आणि बेळगावकडे येणारी वाहने अडकून पडली आहेत. एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला समोरील बाजूने  धडक बसली असून धडक दिलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा राहिल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

दुचाकी जाण्याइतकीही  जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी पोलिस आणि बांधकाम खात्याच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी  भाऊ घेतली असून लवकरच बेळगाव - चोर्ला रस्ता वाहतुकीस खुला होईल असे सांगितले आहे.