• अंगणवाडी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
  • जिल्हा प्रशासनाला निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बूथ लेव्हल ऑफिसरच्या जबाबदारीतून मुक्त करावे,अधिकाऱ्यांची धमकी, दादागिरी थांबवावी, अंगणवाड्यांचे गेल्या १८ महिन्यांपासून थकलेले भाडे तसेच गॅस बिलाची रक्कम त्वरित अदा करावी, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेसच्या (आयटक) नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. यावेळी निदर्शक कार्यकर्त्यांनी अधिकारी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत रोष व्यक्त केला. यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयटकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अंगणवाडी कार्यकर्त्यांना आपल्या विभागाची कामे करतानाच कसरत करावी लागत आहे. त्यातच सर्व्हे आणि बीएलओच्या कामांची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून,अंगणवाडीत मुलांना शिकविण्यासाठी वेळ मिळणे कठीण झाले आहे. परिणामी अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या कमी होत असून अधिकारी अंगणवाडी कार्यकर्त्यांना कारवाईची, निलंबित करण्याची, धमकी देत आहेत. तेव्हा आम्हाला बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करावे,सरकारने गेल्या १८ महिन्यांपासून अंगणवाड्यांचे भाडे तसेच गॅसची बिले मंजूर केलेली नाहीत. त्यामुळे अनेक इमारत मालकांनी अंगणवाड्यांना टाळे ठोकले आहे.आम्हीच पैसे जमवून भाडे आणि गॅसची बिले भरली आहेत. ती रक्कम सरकारने त्वरित मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

यावेळी जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता.