रायबाग / वार्ताहर
रायबाग (ता. कुडची ; जि. बेळगाव) येथे झालेल्या ट्रॅक्टर चोरीचा यशस्वी तपास करताना दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करण्यात रायबाग पोलिसांना यश आले आहे. सिद्धार्थ पी. खोत (वय २१) व विश्वजीत जी. खोत (वय २०, दोघेही रा. विठरायवाडी, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत प्राप्त माहितीनुसार कुडची व मोरब गावामध्ये अनुक्रमे ट्रॅक्टर आणि टिलरची चोरी झाली होती. कुडची पोलीस स्थानकात ट्रॅक्टर चोरी बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे चोरीचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक एस.बी.खोत यांनी दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून न्यू हॉलंड कंपनीचे दोन ट्रॅक्टर (किंमत लाख रु.) आणि टिलर (किंमत ८० हजार रु.) चोरीसाठी वापरलेली दुचाकी (किंमत ४० हजार) असा एकूण ९,२०,०००/- रु. किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख, उपजिल्हा पोलीस प्रमुख अथणी उपविभाग,अथणीचे पोलिस निरीक्षक हारूगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मल्लाप्पा पुजारी, एस. बी. खोत यांच्यासह जिल्हा तांत्रिक विभागाचे एल. डी. सिद्दी, एस. ए. पाटील, आरिफ मुत्नाळ, अनिल पाटील, विनोद ठक्कन्नवर, पी.एस.बबलेश्वर, एस.बी. डेंगेन्नवर आणि सचिन पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
0 Comments