• देवस्थान कमिटी सदस्यांसह भाविकांची मागणी 
  • तहसीलदार के. मंजुनाथ यांना सादर केले निवेदन 

गोकाक / वार्ताहर 

कोन्नूर (ता.गोकाक) येथील श्री लक्ष्मी मंदीर प्रसिद्ध असून  सदर मंदिराला २०७ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे, असे असताना मंदिरासाठी भेट आणि देणगी स्वरूपात आलेल्या सुवर्णालंकार आणि दागिन्यांपैकी मंदिरात अवघे ५६० ग्रॅम सोने असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत  देवस्थान कमिटी सदस्यांसह भाविकांनी मंदिराच्या पुजाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपरोक्त मागणीचे निवेदन गोकाकचे तहसीलदार के. मंजुनाथ यांना सादर करण्यात आले आहे. 

राजू पुजारी आणि केंप्पाण्णा पुजारी हे या मंदिरात पुरोहित म्हणून सेवा करतात. त्यांनीच भेट स्वरूपात आलेले सोन्या-चांदीचे दागिने आपल्या कुटुंबीयांकडेच ठेवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय श्री लक्ष्मी मंदिर हे धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत असल्याने पुजाऱ्यांनी ५ वर्षांपासून देणगी स्वरूपात आलेल्या सोने, चांदी व पैशांचा हिशेब विभागाकडे न देऊन शासनाची फसवणूक केली आहे. परिणामी भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

तेव्हा तहसीलदार के. मंजुनाथ यांनी पुजाऱ्यांकडून मंदिराचा ताबा घेऊन योग्य तपास करावा तसेच तपासणी करून न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारून तहसीलदार के. मंजुनाथ यांनी तपास पारदर्शकपणे करण्याची ग्वाही दिली आहे. 

याप्रसंगी रमाकांता गुड्डकाय, सदस्य अशोक गुड्डकाय, बालेशा गुड्डकाय, सुनिला करनिंगा, परसप्पा अरबगोला, कुमारा गुड्डाकाय, इराप्पा पटागुंडी, सोमशेखर हत्ती, बासू वन्नूरी, सदस्य व तरुण उपस्थित होते.