बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पुढाकार घेतला आहे. दररोज सकाळी शहराच्या विविध भागामध्ये भेट देऊन तेथील कचरा व्यवस्थापन प्रक्रिया आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे ते बारकाईने निरीक्षण करत आहेत. त्यामुळे कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 


दरम्यान आज महिन्याचा दुसरा शनिवार हा सरकारी सुट्टीचा दिवस होता. तरीही महापालिका आयुक्तांनी सकाळी ५.४५  वा. वाहन गॅरेज, किर्लोस्कर रोड, खासबाग वेस्टलँड, ई - कचरा केंद्राला भेट दिली. तसेच तेथील कचरा व्यवस्थापन कामाची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली.


कनिष्ठ आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांनी स्वतःकडे जबाबदारी असलेल्या सहा पैकी पाच वॉर्डांचे इंदूर मॉडेलनुसार विलगीकरण केले आहे. याचीही महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी सर्व आरोग्य निरीक्षक आणि पर्यावरण अभियंत्यांना उर्वरित आरोग्य निरीक्षकांप्रमाणेच सुचना पाळण्याचे निर्देश त्यांनी दिले. यानंतर पीके क्वार्टरला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.