बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावानजीकच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अकबर जमादार (वय २४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी महांतेश पुजार (वय २७) याने बस्तवाडनजीक जंगलात मित्राची हत्या केली आणि नंतर तो मित्राचे मुंडके (शीर) घेऊन गावात आला. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीच्या आधारे हारुगेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून आरोपी महांतेशला ताब्यात घेण्यात आले.

,

खून झालेला अकबर आणि मारेकरी महांतेश हे दोघे मित्र होते. हे दोघे मिळून म्हशी चोरून विकत होते. त्याच्यावर हारुगेरी पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याबाबत प्राप्त माहितीनुसार  आर्थिक व्यवहारातून किंवा खाजगी अश्लील व्हिडिओमुळे झालेल्या वादातून हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अकबर चा मृतदेह हारुगेरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला असून, रुग्णालयानजीक शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.