सुळगा (हिं.) / वार्ताहर
प्रतिवर्षीप्रमाणे सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघ यांच्यावतीने सुळगा (हिं.) व बेनकनहळळी येथील इयत्ता सातवी व दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आज रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी येथील संघाच्या सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाला श्री. लक्ष्मण एस. होनगेकर (चेअरमन मराठा को.ऑप. बँक, बेळगाव) हे प्रमुख अतिथी तर श्री. मनोज प्र. पावशे चिटणीस (म. ए. समिती) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्री.अशोक वाय. पाटील (संस्थापक चेअरमन, बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ, सुळगा (हिं.) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ पश्चिम विभाग बेळगावचे अध्यक्ष, शिवाजीराव आतवाडकर, बेनकनहळळी ग्रा. पं. चे नूतन अध्यक्ष डॉ. यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष सायराबानू हुक्केरी, सुळगा (हिं.) ग्रा. पं. चे नूतन उपाध्यक्ष भागाण्णा कल्लाप्पा नरोटी, येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन श्री बेनके उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकात सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.गौरव समारंभासाठी उपस्थित गुणवंत विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत सुळगा (हिं.) व बेनकनहळळी येथील एसएसएलसी परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर इयत्ता सातवीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा बेनकनहळळीचा विद्यार्थी संकेत मंडलिक याच्याहस्ते सरस्वती प्रतिमा पूजन झाले.
सुळगा (उ.) ग्रा. पं. चे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री.भागाण्णा क. नरोटी यांनी श्रीफळ वाढविले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते व इतर मान्यवरांचे संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नूतन ग्रा. पं. अध्यक्ष - उपाध्यक्ष आणि मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी बेनकनहळळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व उपाध्यक्षा सायराबानू हुक्केरी यांचा पुष्पहार घालून शाल, सन्मानचिन्ह व पानविडा प्रदान करून अनुक्रमे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. लक्ष्मण होनगेकर व बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाच्या बेनकनहळळी शाखा व्यवस्थापिका दीपा तुपारे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. मनोज प्र. पावशे यांच्याहस्ते सुळगा (हिं.) ग्रा. पं. उपाध्यक्ष श्री. भागाण्णा कल्लाप्पा नरोटी यांचा पुष्पहार घालून शाल, सन्मानचिन्ह व पानविडा प्रदान करून सत्कार करण्यात आला.
सुळगा (हिं.) ग्रा. पं. अध्यक्ष श्री. रमेश खन्नूकर हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने उपाध्यक्ष श्री. भागाण्णा कल्लाप्पा नरोटी यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले न्यूज 24 तास मराठी डिजिटल मीडियाचे संपादक श्री. रोहन बाळासाहेब पाटील यांचा मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ पश्चिम विभाग बेळगावचे अध्यक्ष, श्री. शिवाजी आतवाडकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित इतर मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला.
सुळगा (हिं.) व बेनकनहळळी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यानंतर सुळगा (हिं.) आणि बेनकनहळळी येथील इयत्ता दहावी आणि सातवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव आतवाडकर यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने असे कार्यक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली.
तर बेनकनहळळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इच्छित ध्येय गाठायचे असेल तर कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बेनकनहळळी ग्रा. पं. अध्यक्षपद भूषविताना गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
तर प्रमुख वक्ते श्री.मनोज पावशे यांनी इच्छित ध्येयप्राप्तीसाठी अचूक नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रकृती स्वास्थ्य लाभावे याकरिता शिक्षण व खेळाची योग्य सांगड घालून जीवनात प्रगती साधून घ्या असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर यांनी आपल्या विशेष शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाचे व्यवस्थापक एन. वाय. चौगुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांसह, पालक, संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments