बेळगाव / प्रतिनिधी
टिळकवाडी बेळगाव येथील आरपीडी क्रॉस येथे आज, शुक्रवारी अभाविपच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अभाविपच्या निदर्शनांमुळे आरपीडी क्रॉस परिसरातील वाहतूक काही काळ अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सरकारने विद्यापीठांना पुरेसे अनुदान द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कॉलेज विद्यार्थ्यांना सुसज्ज वसतिगृहे आणि तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बसपासचे व्यवस्थित वितरण न केल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी बसपासचे समर्पक वितरण करावे आणि बससेवा द्यावी अशा मागण्या अभाविपच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
सरकारने महिलांना मोफत बसप्रवास योजना सुरु केली असली तरी त्यामुळे शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवास करण्यास जागाच मिळेनाशी झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयांना पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांसाठी समर्पक बससेवा पुरवावी, तसेच विद्यापीठ आणि उच्च महाविद्यालयांना देण्यात येणारे अनुदान कमी करू नये अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी चेतन हिरेमठ, संदीप दंडगल, कीर्ती शिवणकर, परशुराम मंजलकर, बालाजी जवळकर, राहुल अलकुंटे यांच्यासह अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभागी झाले होते.
0 Comments