बेळगाव / प्रतिनिधी
मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचार, हरियाणात सुरू असलेल्या जातीय दंगली, वाढते सायबर गुन्हे, महागाई आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचारचा राष्ट्रीय भारतीय महिला महासंघ (नॅशनल इंडियन वुमेन्स युनियनने) आज बेळगावात निषेध नोंदविला. यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
तत्पूर्वी मणिपूरमध्ये दोन जमातींमधील संघर्षात महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचा प्रकार , हरियाणातील मेवात आणि इतर ठिकाणी दोन जातींमधील हिंसाचार, अश्लील व्हिडीओ, सामाजिक पोस्टच्या माध्यमातून मुली आणि महिलांची बदनामी, महागाई-भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रीय भारतीय महिला विधी सल्लागार मनीषा माने म्हणाल्या , मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या काळात दोन महिलांना विवस्त्र करून एका हिंसक गटाकडून बलात्कार करण्यात आला होता.ही घटना मानवतेला लाजवणारी आहे. या घटनेने देशाची मान झुकविली आहे. या घटनेतील दोषींना फाशी झालीच पाहिजे. तसेच हरियाणात आंतरजातीय हिंसाचार थांबविण्यात यावा. महिलांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे मानहानीकारक सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी, वाढत्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. तेव्हा दरवाढ कमी करावी, रोजगार हमी योजनेत लाभार्थ्यांची नावे असतानाही मजुरी दिली जात नाही. हा भ्रष्टाचार थांबवावा ही आमची मागणी आहे.यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यासाठी आलो आहोत असे त्यांनी सांगितले.
महिला संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या मीरा मादार म्हणाल्या, मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचारामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण झाला आहे. या विरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. वाढत्या महागाईने गोरगरिबांचे हाल झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने महागाई कमी करून अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय महिला राष्ट्रीय संघाच्या अध्यक्षा कला सातेरी, उपाध्यक्षा उमादेवी माने, सचिव कला कार्लेकर, शोभा खणगावी, जुलेखा बाळेकुंद्री यांच्यासह युनियनच्या पदाधिकारी व सदस्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
0 Comments