चंदगड (प्रतिनिधी) :  

चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली . ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात  रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालुक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल ते राव काय करेल? याची प्रचिती तेऊरवाडीकरांनी या श्रमदानातून दाखवून दिली.

येथील श्री ब्रम्हदेव देवस्थान कमिटीच्या ताब्यात जवळपास पाच एकर हुलकाई देवीचे शेत आहे. यापूर्वी हे शेत खंडाने विविध शेतकऱ्यांना साठी दिले जात होते. पण सध्या या परिसरात गव्यांच्या वाढता वावर, शेतीचा वाढता खर्च व शेत मजुरांची कमतरता यामुळे शेत करण्यास कोण तयार होत नव्हते. यानंतर देवस्थान कमिटीने गावच्या श्रमदानातून ही शेती कसण्याचा गतवर्षी निर्णय घेऊन त्याची अंमल बजावणीही केली. आज पुन्हा गावामध्ये पाळक करून संपूर्ण गावातील प्रत्येक घरोघरी स्त्री, पुरुष, युवकांच्या सहकार्यातून रोप लागण करण्यात आली. यासाठी बैलांनी चिखल करण्यात आला. काहींनी रोप काढली, काहींनी भाताच्या पेंड्या पुरवल्या, दोघा - तिघांनी वरखत टाकले, काहींनी शेतात पाणी पुरवठा करण्याचे तर महिलांनी तरु काढून तिची लागण करण्याचे काम केले. एकमेकांच्या सहकाऱ्यातून पारंपारिक गीते गायन करत तीन तासात रोपलागण संपवण्यात आली.  एकीचे बळ सर्व श्रेष्ठ असल्याचे या घटनेतून दिसून येते. शेवटी एकत्रित पणे मांसाहारी व शाकाहारी जेवणावर ताव मारण्यात आला.

पाहुणचाराची आठवण : 

तेऊरवाडीत पूर्वी पाहुणचार करायची परंपरा होती. पाहुणचार म्हणजे कोणतेही कोणाचेही काम गावातील ग्रामस्थांनी जाऊन विनामूल्य करणे. फक्त याचा मोबदला म्हणून ज्याचे काम आहे. त्याने सायंकाळी जेवण देण्याची प्रथा होती. यामध्ये बैलांनी शेत जमीन बसवणे, गवत कापणे-आणणे, मळणे , शेण किट कालवणे, खत घालणे, घर बांधणे, लाकडे आणणे आदि कामे विनामूल्य केली जात. पण आता माणुसकी संपत असताना सर्वच कामांमध्ये पैशांची देवघेव होते. त्यामुळे पाहुणचार हा प्रकार बंद पडला. पण तेऊरवाडीकरांनी आज पुन्हा पाहुणचार प्रथा जपून सर्वांना आनंदाचा धक्का दिला.