• व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना 

चंदगड / प्रतिनिधी 

चंदगड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी धरणं ही पूर्ण क्षमतेने भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तथापि आज ताम्रपर्णी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीवरील कोवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ताम्रपर्णीचे पाणी आता कोवाड बाजार पेठेत शिरू लागले आहे. 

दोनच दिवसापूर्वी प्रशासनाने कोवाड येथे ताम्रपर्णी नदीत पास रेस्क्यू फोर्सची प्रात्यक्षिके घेतली होती. तसेच बाजारपेठेतील धोकादायक भागातील व्यापारी, ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबाबतच्या नोटीस देखील देण्यात आल्या आहेत. आता पाणी बाजारपेठेत शिरत असल्याने व्यापारी, नागरिकांनी आपले समान, सर्व वस्तू सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी सुरू केली आहे. आणखी काही दिवस जर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणी पातळी वाढून पाणी मुख्य बाजारात घुसण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

- कोवाड जुना पुल बंद ; धोक्याचा इशारा -

कोवाड येथील जुना पुल (बंधारा) हा पाण्याखाली गेल्याने त्याठिकाणी प्रशासनाने धोक्याचा इशारा देणारा फलक लावला आहे. तसेच कुणीही पाण्यातून धोकादायक पद्धतीने वाहतूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. तर आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.