•  जिल्हा पोलीसप्रमुखांच्या नेतृत्वाखाली १५ वा फोन - इन कार्यक्रम 

बेळगाव / प्रतिनिधी 

जनतेच्या समस्या जाणून घेण्याकरिता बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सुरू केलेल्या फोन-इन कार्यक्रमाला दिवसेंदिवस  वाढता प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमामुळे नागरिकांच्या मनात  पोलिसांबद्दल आदराची भावना निर्माण होत असून नागरिकही अगदी बिनधास्तपणे आपल्या समस्या व तक्रारी जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर मांडत आहेत.

दरम्यान आज शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील  यांनी आपल्या पथकासह नेहमीप्रमाणे १५ व्या  पंधराव्या फोन - इन कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमात बेकायदा हॉटेल, कौटुंबिक समस्या,शहरातील वाहतूक समस्या याशिवाय विविध तक्रारी मांडण्यात आल्या. यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तक्रारी ऐकून घेत संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या सोडवण्याची ग्वाही दिली. गृहलक्ष्मी योजनेच्या गैरवापराचीही यावेळी तक्रार करण्यात आली.

शहरातील टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेटनजीक घातलेले बॅरिकेट्स पाठविण्यात यावेत अन्यथा शहर पोलिस विभागासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे येथील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. याबाबत वारंवार संबंधितांना कळविण्यात आले आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करून दखल घेतली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. याला उत्तर देताना जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले, जेष्ठ नागरिक असल्याने तुम्ही उपोषण करू नका , तुमची समस्या नूतन शहर पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत ती सोडवली जाईल असे सांगितले.

त्याचप्रमाणे भाग्यनगर परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने रस्त्यावर हंप बसवण्याची मागणी भाग्यनगर पारिजात कॉलनीतील एका व्यक्तीने फोनद्वारे केली. यावर शहर पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याची ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली.

दुबई येथे नोकरीची ऑफर असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शहरातील एका तरुणाने फोनवरून केली. आपण चन्नम्मा सर्कल येथून फोन करत असल्याचे त्याने सांगितले. यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तुम्ही एसपी ऑफिसमध्ये या तुमची समस्या सोडविण्यात येईल, असे सांगितले.

कागवाड तालुक्यातील मोलवाड, बैलहोंगल तालुक्यातील मेकलमराडी येथे बेकायदा मद्यविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करून ते कायमचे बंद करावे अशी तक्रार काहींनी फोनवर केली. याला उत्तर देताना जिल्हा पोलीसप्रमुखांनी, आजपासून बेकायदा मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगितले.

कागवाड तालुक्यातील साखर कारखान्यांना  इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांना बोलावून कारवाई करावी अशी तक्रार करण्यात आली. यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी, गेल्यावेळी फोन केला तेव्हाच संबंधित विभागाला कळविण्यात आले होते. पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनाचे आणून देण्यात येईल. मात्र पोलीस या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल, उपजिल्हा पोलीस प्रमुख वीरेश दोडमणी, पोलीस निरीक्षक महादेव एस. एम., बाळाप्पा तळवार, विठ्ठल मादार, शरणबसप्पा अंजुर आदि उपस्थित होते.