गोकाक / वार्ताहर  

गतवर्षी गोकाक तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात गोकाक पोलिसांना यश आले असून आंतरराज्य चोरट्यांना अटक करून ५५.६० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

गतवर्षी ११-११-२०२२ रोजी विवेकानंद नगर येथील प्रकाश लक्ष्मण टोलीन्नावर यांच्या घरातून तसेच २३-५-२०२३ रोजी गावातील श्री बिरेश्वर मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गोकाक पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले.

बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणूगोपाल आणि उपजिल्हा पोलीस प्रमुख डी.एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून महाराष्ट्रातील ८ आरोपींना अटक करून चोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी केली. अटक करण्यात आलेल्यांकडून ८१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ८.५ किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ५५.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड, बेळगाव सीईएन पीएसआयबी बी. आर.गड्डेकर, हुक्केरीचे पोलीस उपनिरीक्षक एम.आर. तहसीलदार, गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण मोहिते, कोकाक्षर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एम. डी. घोरी, अंकलगी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एच. डी. येरझरवी आणि कर्मचारी बी. व्ही. नेर्ली, व्ही. आर. नायक, डी.जी. कोन्नूर, एस. व्ही.कस्तुरी, एस. बी. मानेप्पगोळ, एस.एच. इरगर, एम. बी. गिद्दगारी, एम. एम. हल्लोळी, एस. एस. देवरा, जी. एच. गुडली, एम. बी  तलवार , एस. बी. पुजेरी, आर. एम. टुबाकी आदींनी कारवाईत सहभाग घेतला होता.

बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणुगोपाळ, निरीक्षक गोपाळ राठोड यांनी पथकाचे कौतुक केले.