• सहकारमंत्री के.एन.राजण्णा यांची सूचना 

बेळगाव / प्रतिनिधी 

सहकार विभागाच्या अखत्यारीतील पीकेपीएस, डीसीसी बँक आणि नागरी सोसायट्यांमध्ये पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी सूचना सहकार खात्याचे मंत्री के.एन.राजण्णा यांनी केली. 

बेळगाव येथे आयोजित विभागीय प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  जिल्हा सहकारी संस्था आणि बँकांमध्ये निधी  गैरव्यवहाराबाबतच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या ३ - ४ वर्षांपासून प्रलंबित असलेली फसवणूक आणि गुन्हेगारी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत. न्यायालयीन स्तरावरील खटल्यांच्या तारखेला अधिकाऱ्यांनी न चुकता हजर राहावे, प्रत्येक बैठकीत योग्य माहिती दिली जात नाही. अधिकाऱ्यांनी पुरेशी माहिती घेऊन बैठकांना उपस्थित राहावे. पूर्वीची माहिती तपासली असता बरीचशी माहिती जुळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

  • पिग्मी कलेक्शनमध्ये सॉफ्टवेअरचा गैरवापर 

डिपॉझिट एजंटांकडून पिग्मी कलेक्शनमध्ये गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीच उघडकीस आली आहेत. सॉफ्टवेअरचा गैरवापर होत आहे. अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. बागलकोट, बेळगाव, विजयपूर, धारवाड, गदग, हावेरी उत्तरा कन्नड जिल्ह्यांतील डीसीसी बँकेत पैशांचा गैरवापर आणि फसवणुकीची काही प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांची सीबीआय स्तरावर चौकशी सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • कृषी कर्ज वितरणावर भर 

विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्ज वितरण व वसुलीकडे लक्ष द्यावे. जनतेने भरपूर ठेवी ठेवल्या आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी काम करावे. एससीएसटीने अल्पसंख्याकांसह सर्व श्रेणीतील लहान शेतकर्‍यांना कर्ज सुविधा देऊन अधिक कृषी कर्ज उपलब्ध करून द्यावे. केवळ जास्त तारण असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज न देता लहान तारण असलेल्या शेतकऱ्यांना कृषी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना मंत्री के.एन.राजण्णा यांनी केली . 

या बैठकीला सहकारी संस्थांचे संचालक डॉ. के. राजेंद्र, सहकारी संस्थांचे उपायुक्त के. एम. आशा, सहकारी संस्थांचे उपनिबंधक प्रकाशराव बेळगाव सहनिबंधक सुरेश गौडा, सहकार विभागाचे कर्मचारी, डीसीसी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.