• आमदार आसिफ सेठ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश 
  • महापालिकेतील आमदार दालनात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव उत्तर मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन आणि ॲप विकसित करून या हेल्पलाईनमध्ये येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश आमदार आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव महापालिकेतील आमदारांच्या दालनात आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी उत्तर मतदार संघातील नागरी समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. 

सर्वसामान्यांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या त्यांनी सर्वांसमोर मांडल्या. समस्या सोडवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा याची  नागरिकांना माहिती नसते. म्हणूनच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना समस्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन आणि ॲप विकसित केले जात आहे. त्या ठिकाणीच सर्व समस्यांकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. 

शहरात सांडपाणी आणि कचऱ्याची समस्या कायम आहे. अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. रस्ते खोदणे सुरूच आहे. जलवाहिनीला गळती असली तरी ती दुरुस्त करता येत नाही. अनेक ठिकाणी पथदिप बंद आहेत, वीजपुरवठा नाही , धोकादायक झाडे आहेत. या हेल्पलाइन आणि ॲपमुळे या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात मदत होणार आहे. यावेळी ॲपमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या बैठकीला महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई, अधिक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर,पाणीपुरवठा मंडळाचे अशोक शिरूर, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विनकुमार शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.