बेंगळूर / वार्ताहर 

राज्यात यापूर्वी अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता,आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबवा, सावधगिरी बाळगल्यास नुकसान टाळता येते. यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. आज राज्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हापंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांनी राज्यातील हवामान, पाऊस आणि शेती विषयक कामांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, पूरस्थिती असताना अनेक शेतकऱ्यांना स्थलांतरित करता येत नाही. त्यामुळे पुराचा अंदाज येताच स्थलांतरणाची कार्यवाही करण्यात यावी. मागील सरकारने पर्याय म्हणून बांधलेली घरे राहण्यासाठी योग्य नाहीत अशा नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. तेव्हा आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा ; तसेच अपघात टाळण्यासाठी  अधिक लक्ष द्यावे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना वारंवार स्थलांतरित करून जीवितहानी टाळण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना  असून, पूरग्रस्त भागाची लोकांनी जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी सूचना त्यांनी केली.जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि जागरूक राहावे असेही ते म्हणाले.

एखाद्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांना असते. त्यामुळे पोलीस, महसूल, पाटबंधारे आणि ग्रामविकास विभाग यांच्यात समन्वय असल्यास मोठी जीवितहानी टळू शकते. याशिवाय दरड कोसळण्याच्या ठिकाणांची माहिती असेल तर तेथील अधिकाऱ्यांनी सावधगिरीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उडपी जिल्ह्यात वॉर रूम फार पूर्वी हटवण्यात आल्या होत्या. येथे अनेक अनर्थ टळले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मात्र उडपी जिल्हा पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत आत्तापर्यंत  ९ जणांचा मृत्यू झाल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खबरदारीच्या उपायोजनांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्व जिल्ह्यांमध्ये हाच उपाय आवश्यक आहे. १ जानेवारी ते २५ जुलैपर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला असून त्यांना तात्काळ मदत देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन सतर्क राहिले असते तर यातील अनेक संकटे टाळता आली असती का असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. पाऊस आणि अतिवृष्टीच्या शक्यतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज पत्रकार परिषद घ्यावी. निसरड्या जागी जाऊ नये तसेच ओसंडून वाहणाऱ्या नद्या - नाले ओलांडण्याचे धाडस करू नये असा सल्ला त्यांनी दिला. मृत्यू रोखण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अंगणवाडी, शाळा इमारती, रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्याची माहिती यापूर्वीच प्राप्त झाली आहे. कोणत्या इमारतींना गळती लागली आहे याचीही माहिती अगोदरच मिळते. मग डागडुजी आणि स्थलांतरणासाठी अनुदान देऊनही आधीच कार्यवाही का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी अशी उदासीनता दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला.

या बैठकीला वंदिता शर्मा,महसूल विभागाचे प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) व्ही. रश्मी, अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.