चिक्कोडी / वार्ताहर 

हिरेकुडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील नंदीपर्वत जैन आश्रमातील आचार्य १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा आज चिक्कोडीतील जैन समाजाने तीव्र निषेध केला. प्रारंभी भीमसेन भट्टारक पट्टाचार्य श्री (वरूर) यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी आरडी हायस्कूल ते सहआयुक्त कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

जैन समाजाचा ध्वज, अहिंसा परमो धर्म, जियो और जीने दो असे फलक हातात घेऊन जैन बांधव व श्रावक आरडी हायस्कूल पासूनच या मोर्चात सहभागी झाले होते. या मूक मोर्चासाठी जैन समुदाय मोठ्या प्रमाणात एकवटला होता. यावेळी सरकारकडे जैनमुनी आचार्य कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच इतर जैन स्वामीजींच्या रक्षणाची मागणी करण्यात आली.

या मोर्चात कोल्हापूरच्या नांदणी मठाचे जिनसें भट्टारक पट्टाचार्य, चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नजीकच्या महाराष्ट्रातील समाज बांधव आणि मुनींचे भक्त सहभागी झाले होते.