बेळगाव / प्रतिनिधी
पावसाविना मृग नक्षत्र कोरडे गेले. मात्र महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे चिक्कोडी विभागातील कृष्णा, घटप्रभा, हिरण्यकेशी, वेदगंगा दूधगंगा यासह अनेक नद्या प्रवाहित झाल्या आहेत. या पावसामुळे उन्हाळ्यात घटलेल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बॅरेजमधून बेळगावमार्गे कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या कृष्णा नदीत ७ हजार क्युसेकहून अधिक पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कागवाड मधील वारणा,महाबळेश्वर, कोयना, कोल्हापूर सांगली आदि कृष्णा नदी पात्रातील अनेक भागात पडलेल्या हलक्या पावसामुळे बेळगाव सीमाभागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे प्रकल्प सुरू पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. याचप्रमाणे रायबाग,अथणी तालुक्यातील गावे आणि शहरांमध्ये उद्भवलेली टंचाईची समस्या दूर झाल्याचे दिसून येत आहे. चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमधून अनेक गावांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी, काळम्मा वाढीसह अनेक धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटप्रभा नदीच्या पलीकडे असलेल्या हिडकल जलाशयात (राजा लखनगौडा धरण) पुरेसा पाणीसाठा आहे उन्हाळ्यात येथे केवळ चार टीएमसी पाणीसाठा होता. महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी काही प्रमाणात प्रवाहित झाली असून अपेक्षित पाणीसाठा नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्याचप्रमाणे चिक्कोडी उपविभागातील कृष्णा व उपनद्यांच्या काठावरील शेतात घेतलेले उसाचे पिक पाण्याविना सुकून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments