सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) (ता.बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रमेश खन्नूकर यांची अध्यक्षपदी तर भागाण्णा नरोटी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

गुरुवार दि. २७ जुलै रोजी सुळगा (हिं.) ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. अध्यक्षपदासाठी कल्लेहोळ येथील ग्रा. पं. सदस्य रमेश खन्नूकर व सुळगा (हिं.) येथील ग्रा. पं. सदस्या वर्षा सांगावकर यांच्यात लढत झाली. या लढतीत रमेश खन्नूकर यांनी (१० विरुद्ध ९) अशा अवघ्या १ मताच्या फरकाने विजय संपादन केला. तर उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या  लढतीत भागाण्णा नरोटी यांनीही प्रतिस्पर्धी उमेदवार दीपा तोरे यांचा अवघ्या १ मताच्या फरकाने पराभव केला. भागाण्णा नरोटी यांना १० मते मिळाली. तर दीपा तोरे यांना ९ मतांवर समाधान मानावे लागले.

यावेळी मावळत्या अध्यक्षा निर्मला कलखांबकर आणि मावळत्या उपाध्यक्षा अश्विनी खन्नूकर यांच्यासह  पीडीओ आणि  उपस्थित सर्व ग्रा. पं. सदस्यांनी नूतन अध्यक्ष रमेश खन्नूकर व  उपाध्यक्ष भागाण्णा नरोटी यांचे अभिनंदन व स्वागत केले. निवडणूक नोडल अधिकारी म्हणून पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता संजयकुमार माळगी यांनी काम पाहिले.