बेंगळूर दि. २८ जुलै २०२३ : 

तरुण युवावर्ग ही देशाची संपत्ती आहे. तरुणांच्या माध्यमातून देशाची प्रगती झाली पाहिजे. याकरिता देशाच्या उज्वल भवितव्यासाठी युवकांनी सक्षम व्हावे असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. कर्नाटक युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून बेंगळूर येथील पॅलेस मैदानावर आयोजित 'फाउंडेशन ऑफ ए बेटर इंडिया' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, २०२४ ची निवडणूक हे पुढचे ध्येय आहे आणि हे लक्ष्य आपल्याला गाठायचे आहे. भविष्यातील नेतृत्व घडविण्यात युवा घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचायत स्तरावरून मी राजकारणाची सुरुवात केली. यानंतर दोन वेळा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र अपयशाने खचून न जाता प्रभाग स्तरावर काँग्रेस पक्ष संघटित केल्याने, आज मला मंत्री होण्याची संधी लाभली याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आपल्या सर्वांचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बिनबुडाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. पण असे असतानाही पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळेचं मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समवेत काँग्रेस पक्ष बळकट केल्यामुळे आज राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. युवक हेच समाजाचे भविष्य आहेत हे ओळखून इंदिरा गांधींनी भविष्यातील  युवा नेते घडविण्यासाठी युवक काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे युवक काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.

माझ्यासह राज्यातील अनेक नेते  काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत, नेतृत्व आणि संघर्षाचे गुण जोपासण्यासाठी काँग्रेस पक्ष उत्तम संघटना आहे. येथे राजकारणाचे कौशल्य तुम्ही कसे आत्मसात करता यावर तुमचे भवितव्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तरुण समाजाने निश्चय केला तर ती ताकद आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. आता २०२४ ची निवडणूक हेच सर्वांचे ध्येय आहे, असे त्या म्हणाल्या. 

एकंदरीत देशातील परिस्थिती पाहता लोकशाही व्यवस्था, संविधान आणि घटनात्मक संस्था अधिक बळकट करण्यासाठी युवा वर्गाने निर्धार करण्याचे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले.