खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले तसेच तलावांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मलप्रभा नदी तुडुंब भरून वाहत आहे. दरम्यान याच पावसात दक्षता घेऊन मेरडा - करजगी मार्गावरील तलावाचा बांध वाचविल्यामुळे नूतन ग्रामपंचायत अध्यक्षांच्या कामाचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायत हद्दीतील मेरडा - करजगी मार्गावर एक मोठा तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तलाव तुडुंब भरल्यानंतर तलावाचा बांध फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे रविवारी पहाटेच्या सुमारास आढळून आले. सदर बाब नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या निदर्शनास काहींनी आणून दिली. लागलीच महाबळेश्वर पाटील यांनी पाहणी केली. तलावाचा संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोन जेसीबी व एक टिप्परच्या साह्याने तलावाच्या बांधाची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न हाती घेतले. या कामी ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे हा तलाव दोनशेहून अधिक एकर जमिनीसाठी लाभदायी आहे. पण हाच तलाव जर फुटला असता तर दोनशेहून अधिक एकरातील भात पिकाचे नुकसान झाले असते, यात शंका नाही.
एकंदरीत वेळीच दखल घेऊन हाती घेतलेल्या कामाबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments