• हत्येनंतर पती पोलिसांना शरण 

बेळगाव / प्रतिनिधी 

कौटुंबिक वादातून पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पतीने स्वतः पोलीस स्थानकात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांना शरण आला. नागनूर (ता. मुडलगी ; जि. बेळगाव) येथे शुक्रवारी रात्री १०.३० वा. सुमारास ही घटना घडली. बसव्वा हणमंत हिडकल (वय ३०) असे मृत पत्नीचे तर हणमंत सिद्धप्पा हिडकल (वय ३५) असे आरोपी पतीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, हणमंत कोणताही काम धंदा करत नव्हता. तर पत्नी बसव्वा उदर निर्वाहासाठी मोलमजुरीचे काम करून कौटुंबिक प्रपंच सांभाळायची. पती कामाविना इतरत्र फिरत असल्यामुळे या दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. शुक्रवारी अशाचप्रकारे झालेल्या भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संताप अनावर झालेल्या  हणमंतने बसव्वा हिचा गळा आवळून खून केला. या दाम्पत्याला दहा वर्षाचा एक मुलगा आहे. आईच्या खुनामुळे वडील  तुरुंगात गेल्याने दहा वर्षाचा मुलगा अनाथ झाला आहे. या प्रकरणाची नोंद मुडलगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.