- श्रीराम सेना हिंदुस्तानचा इशारा ; नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (प्रतिनिधी) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न झाल्याने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ तलावातील गाळ काढावा, अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने दिला आहे. याबाबत बुधवारी (ता.७)सायंकाळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनातील माहिती अशी, पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जवाहर तलावातील गाळ काढला होता. त्यानंतर आज पर्यंत तलावातील गाळ न काढल्याने सध्या १३ते १५फूट इतका गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात हे पाणी वापरता येत नाही. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोणतीही काळजी घेतलेली नाही.
सध्या जून महिना असला तरीही अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अजूनही दहा ते पंधरा दिवसात तलावातील गाळ काढणे शक्य आहे. त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करून तलाव काळ मुक्त करावा. कसे झाल्यास यंदा तलावात आठ ते दहा फूट जादा पाणीसाठा होऊन निदान या वर्षा पासून तरी शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. याबाबत नगरपालिकेने तात्काळ निर्णय घेऊन कामाला सुरुवात करून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करावा.
आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती, श्रेयस आंबले, सुनील दळवी, योगेश कोठीवाले, श्री मानकर, मल्लिकार्जुन जोगदे, प्रशांत केस्ती, धीरज अलखनुरे, भरत शिंदे, निलेश शेलार, लखन बेळगेकर, सुधीर बुरुड, हर्षल पोतदार, विशाल पोतदार, सुरज माने, संजय शिंत्रे, राजू नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments