- मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सूचना
- बेळगाव महापालिका सभागृहात प्रगती आढावा बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव, स्मार्ट सिटी प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट, स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. आज बुधवार दि. ७ जून रोजी महापालिका सभागृहात आयोजित स्मार्टसिटी, पाणीपुरवठा, हेस्कॉम यासह विविध विभागांच्या कामकाजाबाबत आढावा येण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना या सूचना केल्या.
यावेळी ते पुढे म्हणाले, जनतेच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याची जबाबदारी आपली आहे. स्मार्टसिटी, हेस्कॉमसह महत्त्वाच्या विभागांची स्वतंत्र बैठक होणार आहे. अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला जाईल लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक चांगले काम केले पाहिजे. महापालिकेच्या सदस्यांनी नमूद केलेली कामे प्राधान्याने करावी असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुतळ्याचे बांधकाम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. याशिवाय क्रीडा संकुल, जलतरण तलाव व इतर कामे विहित मुदतीत पूर्ण करून सार्वजनिक वापरासाठी मोफत करण्यात यावीत, बैठकीत जनतेने मांडलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात यावे. चांगल्या सूचनांची अंमलबजावणी करावी अशी सूचना ही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.
बेळगाव शहराकडे येणाऱ्या मार्गावर कचऱ्याचे ढीग दिसतात, त्याची नियमित स्वच्छता करण्यासाठी पावले उचलावी, रात्रीच्या वेळी ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकल्यास व्यापारी व दुकानदार यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना दंड ठोठावण्यात यावा, अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.
गृहनिर्माण योजनेअंतर्गत अर्ज करून कर्जाचा भरणा केला होता, मात्र आता काही कारणास्तव घरांची सुविधा नको असेल त्यांनी कर्जाचे पैसे परत करण्यासाठी अर्ज केल्यास ते परत करण्याची कार्यवाही करण्यात यावी. एका महिन्यात त्यांना कर्जाचे पैसे परत करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले. काकतीतील काही भाग महापालिकेच्या अखत्यारित येत असून कर भरूनही इमारत बांधकामाला परवानगी दिली जात नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.
प्रभाग समिती अध्यक्ष स्थापन झाल्या नसल्याची माहिती मिळाल्यानंतर येत्या एका महिन्यात प्रभाग समिती स्थापन करण्यात येतील,असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. बेळगाव शहरात विकासकामांना गती येण्यासाठी आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. नगरसेवकांची निवड यादी तयार असल्यास तातडीने नियुक्ती आदेश जारी करावे अशा सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
एकाच टप्प्यात १५५ सनदी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी शहरातील सर्व कूपनलिका पुनरुज्जीवित कराव्यात ; आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नियमानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने तेथे कचरा विल्हेवाट लावणारे युनिट स्थापन करण्याची गरज आहे. चारही दिशांना एक युनिट स्थापन करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत, शहरात सर्वत्र एल.ई.डी लाईट बसविण्याची कार्यवाही करावी. काही ठिकाणी कमी क्षमतेचे लाईट बसवल्यामुळे पुरेसा प्रकाश मिळत नाही, अशा ठिकाणी जास्त क्षमतेचे लाईट बसवावेत असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
महिला व बालविकास, अपंग ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील शहरातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी तातडीने कचरा उचल युनिट साठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरात सुरू झालेली सहा इंदिरा कॅन्टीन कशी चालवले जातील या प्रश्नावर बस स्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक लोकांना सुविधा देण्याला अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.
आमदार आसिफ सेठ यांनी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाला होणारा विलंब आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील समस्या समजावून सांगितल्या आणि एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे सूचना दिल्या.
स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्वाधिक कामे बेळगावत सुरू असून केवळ दक्षिण मतदार संघात जास्त कामे हाती घेण्यात आल्याच्या जनतेच्या आरोपाविरोधात बोलणारे आमदार सेठ यांनी स्मार्ट सिटी ची मूळ रूपरेषा काय होती याची माहिती अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना दिल्या.
स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आणि नंतर झालेले बदल यावर बैठकीत राजीव टोप्पण्णावर म्हणाले, स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आयआयटी कडून केले जात आहे. हे नामांकित संस्थांना द्यावेत असा आग्रह त्यांनी धरला. सिद्धगौडा मोदगी यांनी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे करावीत अशी सूचना केली.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांच्या दर्जाबाबत आमदार अभय पाटील म्हणाले कोणत्याही कामांबद्दल तक्रारी आल्या असल्यास त्यांची कोणत्याही संस्थेकडून चौकशी करता येईल. बेळगाव दक्षिण मतदारसंघात एकूण ४७० कोटींची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाबाबत आणि बेकायदेशीर कामांबाबत जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने सर्वकष चौकशी करावी अशी मागणी अभय पाटील यांनी केली.
गृहनिर्माण योजनेसह कोणत्याही योजनेच्या सुविधांचे नियोजन करताना ग्रामीण मतदारसंघातील प्रभागांचा विचार का करण्यात आला नाही असा प्रश्न विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केला. चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असून जनतेने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. तांत्रिक कारणांमुळे एलअँडटी कंपनीला दंड करणे वाजवी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वतंत्र बैठक बोलावून कामे पुरेशा प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गृहनिर्माण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी निश्चित हप्ता न भरल्यास किंवा अपात्र लाभार्थ्यांना वगळून नवीन योजना तयार करण्याची सूचना केली. यासाठी ग्रामीण मतदारसंघाच्या प्रभागातील नागरिकांचा विचार करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी शहरातील रिकाम्या विद्युत खांबांसाठी अतिरिक्त ९ हजार एल.ई.डी लाईट बसवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच लाईट बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार, केयुआयडीएफसी सहसंचालक पद्मा, महानगर निगम, स्मार्ट सिटी, केआयडीएफसीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पालिकेच्या वतीने महापौर व उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments