• कलघटगी तालुक्याच्या जिन्नूर गावातील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी

शेतातील घरामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यात चटणी पावडर टाकून गळा दाबून एका युवकाचा खून केला. कलघटगी तालुक्यातील जिन्नूर गावात ही घटना घडली. निंगाप्पा बुडप्पा नवलुर (वय २८) असे खून झालेल्या युवकचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

येत्या ७ जून रोजी तावरगेरे गावातील तरुणीसोबत त्याचे लग्न होणार होते. तर साखरपुडा नुकताच झाला होता. मात्र सुखी वैवाहिक जीवनाची त्याची स्वप्ने धुळीस मिळाली. काल मध्यरात्री मारेकरी त्याचा खून करून फरार झाले. माहिती मिळताच कलघटगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची नोंद कलघटगी पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.