• महिलांनी फिरवली पाठ ; दिवसभराचा डिझेल खर्चही निघेना

निपाणी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात आपले सरकार आल्यानंतर महिलांसाठी मोफत बस सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्यात सरकार स्थापन होताच १० जून पासून राज्यभर महिलांना मोफत प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे महिलांनी वडाप व खासगी वाहनांकडे पाठ फिरवली आहे. त्याचा निपाणी आणि परिसरातील वडाप वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे. परिणामी दिवसभर थांबूनही डिझेलचा खर्च निर्णय कठीण झाले आहे.

यापूर्वी निपाणी बस स्थानकातून बसने महिला व पुरुष करत होते. बस वेळेत जात नसल्याने अनेक प्रवासी वडापाहतुकीला पसंती देत होते. शिवाय वडाप वाहतुकीमुळे प्रवाशांना हवे तिथे उतरण्याची मुभा होती. पण आता मोफत बस सुरू केल्याने सर्वच महिला बसनेच प्रवास करण्यावर भर दिला आहे. परिणामी केवळ चारच दिवसात अनेक मार्गावरील वडाप वाहतुकीचे वाहने कमी झाली आहेत. निपाणी येथून मांगुर, कुरली,आप्पाचीवाडी, संकेश्वर, खडकलाट, बेनाडीसह अनेक मार्गावर दहा ते पंधरा वडाप कार्यरत होते.  त्यापैकी अनेक जण नोकरी व्यवसाय नसल्याने कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. दिवसभर वाहतूक करून डिझेल खर्च वजा जाता २०० ते ४०० रुपये कमाई होत होती. पण आता सर्वच महिलांनी या वाहतुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते व व्याज कसे भरायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. दिवसभरात अनेक गावासाठी केवळ दोन ते तीनच बस असल्याने अशा गावाकडे जाणारे प्रवासीच वडापने प्रवास करत आहेत. त्यामुळे उर्वरित मार्गावरील वाहने काही दिवसातच बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत मोफत बस  प्रवासाचा फटका बसत असल्याने अशा व्यवसायीकांची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्रातही अर्धे तिकीट

निपाणी पासून काही अंतरावरच महाराष्ट्राची हद्द सुरू होते. त्यामुळे दोन चार दिवसापासून कर्नाटकात वडाची वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांनी महाराष्ट्रात जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही महिलांना अर्धे तिकीट असल्याने प्रवासी वाहतूक करणे कठीण झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

'सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू केला आहे. ही समाधानाची बाब असली तरी दुसऱ्या बाजूला खाजगी वडाप करणाऱ्या वाहतूकदारांना सरकारने दिलासा देण्याची गरज होती. या व्यवसायिकाबाबत कोणताच विचार न केल्याने जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशा व्यवसायासाठी शासनाने मदत निधी अथवा नव्या योजना राबवाव्यात.'

- मच्छिंद्र पाटील, वडाप व्यवसायिक, कुरली