खानापूर / प्रतिनिधी

पूर्वीच्या काळात स्मशानभूमीला महत्त्व होते अन् आजही आहे. सध्याच्या स्मार्ट वैज्ञानिक युगात  स्मशानभूमी बद्दलची भीती आणि धास्ती काहीशी कमी होताना दिसत आहे. पण याच स्मशानभूमीत कुणी विसावा घेतल्याची बाब सर्वांनाच अचंबित करणारी ठरेल.

खानापूर शहरातील मलप्रभा नदी काठावर असलेल्या एका स्मशानभूमीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गापासून मलप्रभा नदी काठावर चौगुले यांच्या शिवारात अंत्यसंस्कारासाठी शेड उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी दोन विदेशी पर्यटक दुचाकीने या मार्गावरून जात असता, झोप अनावर झाल्याने त्यांनी रात्र येथेच काढावी या विचाराने स्मशानभूमीतच विसावा घेण्याचा निर्णय घेऊन तेथेच वास्तव्य केले.

कुतूहलाची बाब म्हणजे आपल्या सोबत आणलेल्या कापडी झोपाळे  स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी चौथर्‍याला बांधून त्यांनी आपली संपूर्ण साहित्य तिथे ठेवले आणि रात्रभर निवांत झोप घेतली. गुरुवारी पहाटे या मार्गावरून  मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या काही जणांना स्मशानभूमी दोघेजण झोपण्याची माहिती मिळाली अन् काही क्षणासाठी तेही आश्चर्यचकित झाले. त्यांनीही बाब इतरांना सांगितली.

सूर्योदय होताच विदेशी पर्यटकांनी पुढे वाटचाल सुरू केली पण घडल्या प्रकाराची  परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.