बेळगाव / प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्रात भरमसाठ वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात गुरुवारी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली लघु उद्योजक संघटना, बेळगाव फौंड्री क्लस्टर, फौंड्रीमन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, हॉटेल ओनर्स असोसिएशन अशा ५० हून अधिक संघटना,उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

हेस्कॉमने उद्योगांसाठी ३० ते ७०% या प्रमाणात भरमसाठ वीज दरवाढ लागू केली आहे. परिणामी  बेळगावच्या उद्योगांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बेळगावातील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेत हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून वीज दरवाढ आणि सरकारचा निषेध नोंदविला.

प्रारंभी शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चात सहभागी उद्योजक आणि कामगारांनी वीज दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योजकांनी सरकार आणि वीज पुरवठा कंपनीच्या मनमानी वीज दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. भाजप नेते शंकरगौडा पाटील यांनी, काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यापासून मनमानी सुरु केल्याचा आरोप करून वीज दरवाढ हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. जनतेने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे याचा अर्थ हवे ते करू असे धोरण राबवू नका, बेळगावचे उद्योग आधीच संकटात आहेत, त्यांना आणखी संकटात लोटू नका, अन्यायी पद्धतीने केलेली कोणालाही न परवडणारी वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना व्यापारी व भाजपचे नेते शरद पाटील आणि उद्योजक सचिन सबनीस म्हणाले, राज्यात बेंगळूरनंतर सर्वाधिक उद्योग बेळगाव जिल्ह्यात आहेत. राज्यात सर्वात जास्त ३२ हजार लघु उद्योग बेळगाव जिल्ह्यात आहेत. या सर्व उद्योगांमार्फत दीड ते दोन लाखजणांना रोजगार मिळाला आहे. परंतु हेस्कॉम आणि सरकारने उद्योगांना प्रचंड प्रमाणात वीज दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे बेळगावचे उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडून बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसे झाल्यास उद्योजक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.त्याशिवाय दीड ते दोन लाख कामगार बेरोजगार होणार आहेत. दरवर्षी ५% ते १०% या प्रमाणात वीज दरवाढ केली जाते. ती स्वीकारून आम्ही बिलेदेखील भरतो. मात्र यावर्षी तब्बल ३०% ते ७०% या प्रमाणात भरमसाठ वीज दरवाढ लागू केल्याने आम्ही उद्योग कसे चालवायचे या संकटात सापडलो आहोत असे त्यांनी सांगितले.

आम्ही कर्नाटकाच्या विरोधात नाही. कर्नाटकाला देशातील प्रगतशील, उद्योगसंपन्न राज्य बनवण्यासाठी आम्ही योगदान देत आहोतच. त्यामुळे आमच्यावरील वीज दरवाढीचे संकट दूर करावे. बेळगाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी आमची व्यथा सरकारच्या कानावर घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अन्य उद्योजक आणि व्यापाऱ्यांनीही वीज दरवाढीचा निषेध करून ती मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केल्यानंतर उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

या आंदोलनात लघु उद्योजक संघटना, बेळगाव फौंड्री क्लस्टर, फौंड्रीमन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, हॉटेल ओनर्स असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, विकास कलघटगी, बसवराज जवळी आदींसह उद्योजक, व्यापारी आणि कामगारांनी सहभाग घेतला होता.