• यरनाळमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन

निपाणी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागून जीवनात त्याचा पाया घातला जातो. या शिबिरातून विद्यार्थ्यांना घडविण्यासह समाजाचा विकास करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करणे आवश्यक आहे, असे मत येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महांतेश हुरळी यांनी व्यक्त केले

राणी चन्नमा विश्वविद्यालय केएलई संस्थेच्या निपाणीतील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या वतीने बुधवार  (ता.२१) ते मंगळवार पर्यंत (ता.२७) यरनाळ येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाट प्रसंगी ते बोलत होते. हे  शिबिर राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. श्रीपती रायमाने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

यरनाळ मधील प्राथमिक शाळा आवारात या शिबिराचे उद्घाटन  ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्षा मीनाक्षी सुतार, सदस्य दिग्विजय निंबाळकर,आनंद संकपाळ, प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी, उपप्राचार्य डॉ.आर. जी. खराबे,  प्रा. सुरेश शिंगटे, प्रा. एस. एस. कुंभार यांच्या उपस्थितीत रोपाला जलार्पण करून झाले.

प्रा. डॉ. श्रीपती रायमाने यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिबिरात आरोग्य तपासणी, कृषी विषयक माहिती, शैक्षणिक सर्वे, बेरोजगारीची माहिती, खेळाच्या मैदानाची स्वच्छता, शैक्षणिक जागृती, स्वच्छता अभियान,परिसर संरक्षण, वृक्षरोपण,  प्लास्टिक मुक्त भारत, सौर ऊर्जा विषयी माहिती, डेंगू ,एड्स, चिकनगुनिया आदी आजाराविषयी जागृती व मोफत आरोग्य तपासणी आणि वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.