- अंतिम सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी दारुण पराभव
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा अपयश
ओव्हल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले आहे. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २३४ धाावंवर आटोपल्याने आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.
टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपले नाव कोरण्यात अपयश आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान दिले होते. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या ८६ धावांच्या भागिदारीने भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद १७९ अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव २३४ धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपले नाव कोरले.
भारतीय संघाचा १० वर्षांपासून आयसीसी चषक विजयाचा दुष्काळ कायम राहिला. आज अनेक क्रीडा प्रेमींचे स्वप्नही भंगले. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफीची नोंद झाली. विशेष म्हणजे, आयसीसीच्या सर्व ट्रॉफी नावावर करणारा ऑस्ट्रेलिया संघ ठरला.
भारतीय संघाकडून आघाडीच्या खेळाडूंनी जम बसल्यानंतर विकेट फेकल्या. रोहित शर्मा 43, चेतेश्वर पुजारा 27, विराट कोहली 49 आणि अजिंक्य रहाणे 46 यांनी चुकीचा फटका मारत आपल्या विकेट फेकल्या. याचाच फटका टीम इंडियाला बसला. रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांना खातेही उघडता आले नाही. नॅथन लायनने याने चार विकेट घेतल्या. तर स्कॉट बोलँडने तीन महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. तर पॅट कमिन्सने एक तर स्टार्कने 2 गडी बाद करत भारतीय फलंदाजीचा फडशा पाडला.
0 Comments