नंदगड / वार्ताहर
डोक्यात घाव घालून वृद्धाचा निर्घृण खून केल्याची घटना नंदगड (ता. खानापूर) पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या भुत्तेवाडी येथे आज रविवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय ७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार लक्ष्मण सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून येथे सुतार काम करत होते. पण काल रात्री दगडाने डोके ठेचून त्यांचा खून करण्यात आला आहे. वृद्ध व्यक्तीच्या डोक्यात जोरात वार केल्यामुळे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला हे अद्यापही समजू शकलेले नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments