बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या उपनगरी भागातील कणबर्गी गावच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत व त्यापुढील मुख्य रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र ते मध्येच अचानक बंद करण्यात आल्याने  रहिवाशांसह वाहन चालकांची गैरसोय होत असून त्रास सहन करावा लागत आहे. 

याच पार्श्वभूमीवर आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी याठिकाणी भेट देत रस्त्याची पाहणी केली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.महिनाभरापूर्वी झालेल्या वळीव पावसात चिखल दलदल निर्माण झाल्याने येथे बरेच अपघातही झाले. यात वाहनचालक व पादचारी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळेच या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली. 

यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला त्यांनी चांगलेच धारेवर धरले, काम प्रलंबित ठेवल्याबद्दल जाब विचारला. बंद पडलेले काम उद्यापासून त्वरित सुरू करा आणि होत नसेल तर तसे सांगा,आम्ही काय ती पर्यायी व्यवस्था करू असे खडेबोल त्यांनी सुनावले. तसेच काम दर्जेदार पद्धतीने आणि लवकर पूर्ण करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या आहेत. यावेळी स्थानिक नगरसेविका अस्मिता पाटील तसेच मनपा, स्मार्टसिटी अधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.