- धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याचा नोंदविला निषेध
- कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी
- चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून निदर्शने
- जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात आज शनिवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन छेडले. यावेळी विविध मठाधीश, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यानंतर धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आपला भारत देश हा हिंदूराष्ट्र आहे. कर्नाटक हा भारताचा एक भाग आहे. हिंदूंना धर्मांतरापासून वाचवणे आणि आपल्या धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य आहे. केवळ अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या देश बांधवांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या काँग्रेस सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय संविधानानुसार भारतात हिंदू आणि अन्य धर्मियांना एकत्र राहण्याची परवानगी घटनेने दिली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकातही हिंदूंबरोबर अन्य धर्मियांनाही त्यांच्या धर्माचे आचरण करण्याची परवानगी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बजरंग दल जिल्हा संयोजक भावकाण्णा लोहार म्हणाले, गत निवडणुकीत हिंदूंनी ही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केले. हिंदूंच्या मतांमुळे काँग्रेस सत्तेवर आले आहे. मात्र सत्तेवर येतात काँग्रेसने मतदान केलेल्या हिंदू धर्मियांचा केलेला हा विश्वासघात आहे अशी जोरदार टीका केली. तसेच धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा मागणी त्यांनी केली.
सरकारने त्वरित धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा येत्या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय धार्मिक विभाग प्रमुख बसवराज यांनी दिला.
या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष डॉ. एस.आर.रामनगौडा, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, कृष्णा भट्ट, मुरूगेंद्रगौडा पाटील, शरद पाटील तसेच हिंदू बांधव भगिनी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments