बेळगाव : मराठा एकता एक संघटन बेळगाव यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

शानभाग हॉल युनियन जिमखाना कॅम्प येथे आयोजीत सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा एकता एक संघटना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण झंगरूचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर रेश्मा पाटील, गजानन मिसाळे, माजी नगरसेवक अनिल पाटील, सागर झंगरुचे, नारायण सांगावकर, विठ्ठल वाघमोडे तसेच प्रमुख वक्ते म्हणून सरकारी सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले, कवी प्रा. निलेश शिंदे, शाहीर वेंकटेश देवगेकर, आदित्य पाटील, संदीप ओऊळकर, विजय तिप्पानाचे, गोपाळ पाटील, नारायण झंगरूचे आणि सेवानिवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या हस्ते एसएसएलसी परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी स्वागत अमोल जाधव यांनी, तर प्रास्ताविक शिवाजी कंग्राळकर यांनी केले. कल्लाप्पा पाटील व राजकिरण नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, वेंकटेश देवगेकर , प्रमुख वक्ते रणजीत चौगुले आणि अध्यक्षीय समारोप नारायण झंगरूचे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी बेळगाव भागातील शंभर पेक्षा अधिक शाळातील विद्यार्थी शिक्षक पालक यांचा विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. संजीवनी खंडागळे आणि कवी शिवाजी शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. नितेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक शिक्षक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.