बेळगाव / प्रतिनिधी

येळ्ळूर येथील एका व्यक्तीचा डोक्यात दगड किंवा अवजार घालून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार  अनगोळ तलावाशेजारील शेतवाडीमध्ये आज गुरुवारी उघडकीस आला. संजय तुकाराम पाटील (वय ३४ रा. जिजामाता गल्ली, येळळूर) या व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आज सकाळी अनगोळ येथील शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याच्या डोक्यात दगड किंवा अवजड वस्तूने प्रहार करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार संजयला दारूचे व्यसन होते. तो काल दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडला होता. मात्र रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत अनगोळ तलावानजीक  शेतात आढळून आला. मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून अज्ञात हल्लेखोरांनी एखादे जड अवजार किंवा दगड डोक्यात  घालून त्याची हत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. डोक्यात वर्मी मर लागल्याने अतिरक्तस्रावामुळे खाली कोसळलेल्या संजयचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचे पर्यावसान सदर खुनामध्ये झाले असल्याचा अंदाज आहे. 

आज सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास खुनाचा हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तेव्हा टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचानामा करण्याबरोबरच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविला. पोलीस उपायुक्त, टिळकवाडी पोलिस स्थानकाचे निरीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संजय पाटील याच्या खून प्रकरणी टिळकवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.