- योगदिनानिमित्त सुवर्णसौधच्या प्रांगणात सामूहिक योगासने
बेळगाव / प्रतिनिधी
“वसुदैव कुटुंबकम” या घोषणेसह आज बुधवार दि. २१ जून रोजी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाचा एक भाग म्हणून सुवर्ण विधान सौधच्या पश्चिम दरवाजाच्या पायऱ्यांसमोर हजारो लोकांनी सामूहिक योगासने केली.
प्रारंभी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याहस्ते सामूहिक योगासन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबरद, जीआयपी अधिकारी रवी बंगारप्पनवर, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुनधोळी, तहसीलदार सिद्धराज भोसगी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुवर्ण विधान सौधाच्या प्रांगणात जमलेले विद्यार्थी, योगसाधक आणि मान्यवरांनी सुमारे ४५ मिनिटे विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर ताडासन वृक्षासन, पद्म हस्तासन, अर्धा चक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, उथना मंडुकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंधासन, उथना पदासन, शवासन, प्राणायाम यासह विविध आसने करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, योगाचा अवलंब करून देशातील प्रत्येकाने निरोगी व्हावे, हाच योग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाची ओळख करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.
इंदिरा जोशी व टीमने कार्यक्रमाचे संचालन केले. बेळगाव महानगर पालिका, जिल्हा आयुष विभाग, महर्षी योग हेल्थ फाउंडेशन आणि विविध योग संस्था, योगसाधकांच्या सहयोगाने हा कार्यक्रम झाला.
0 Comments