• बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली 

बेळगाव / प्रतिनिधी 

मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने अर्धा जून महिना उलटला तरी कर्नाटकासह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील जिवंत पाण्याचे स्त्रोत असलेल्या धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. परिणामी पाऊस पडावा म्हणून नागरिक आणि शेतकरी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत. आणखी आठवडाभरात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणारं आहे.    

गेल्या १९ दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनची चिन्हे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. कोयना धरण हे १०३ टीएमसी क्षमते एवढे मोठे धरण आहे. हे धरण उत्तर कर्नाटकातील ६ जिल्ह्यांची तहान भागवते, आता कोयना धरणानेही डेड स्टॉकची पातळी गाठली आहे.  सध्या कोयना धरणात केवळ ११.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. 

यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कर्नाटकला पाणी सोडण्याची विनंती केली होती. मात्र, पाण्याअभावी केवळ १५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रातही पाण्याची टंचाई आहे. दरम्यान, उत्तर कर्नाटकातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील  मलप्रभा  घटप्रभा आणि कृष्णा या नद्या कोरड्या  पडल्या आहेत. विशेषतः, उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, यादगिरी, रायचूर या सहा जिल्ह्यांसाठी कृष्णा नदी जिवंत पाण्याचा स्रोत होती. मात्र उपसा वाढल्याने आता कृष्णा नदीचेही पाणी कमी झाले असून  जिल्ह्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. 

शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अजूनही चातक पक्ष्यांप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. बेळगाव जिल्ह्यातील राकसकोप, घटप्रभा आणि मलप्रभा जलाशयातील पाणीसाठा पूर्णपणे रिकामी झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यातील जनता आणि बळीराजाकडून पाऊस पडावा यासाठी  सातत्याने परमेश्वराला साकडे घालण्याचे प्रकार सुरु आहेत. वरुणराजा मात्र कोणतीच दया न दाखविता रुसून बसला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उत्तर  कर्नाटकातील जनतेपुढे पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकणार आहे. 

 पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न 

- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली टास्कफोर्सची बैठक

जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात  ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवार (1९ जून)  रोजी झालेल्या अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सर्व तहसीलदार व स्थानिक संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व तहसीलदारांनी स्वतःच्या मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेऊन आवश्यक अनुदानाबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. 

जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता तातडीची कामे करण्यासाठी ग्रामीण पेयजल पुरवठा विभागात पुरेसे अनुदान उपलब्ध आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींमध्ये अनुदान उपलब्ध असून, खासगी कूपनलिका उपलब्ध असल्यास ते तात्काळ भाडोत्री  घ्यावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे.