खानापूर / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक  संघटना खानापूर विभाग यांच्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला. खानापूर येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बनोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सभासद लक्ष्मण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच आमदार विठ्ठल हलगेकर  यांचा परिचय करून दिला. यानंतर संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल हलगेकर यांचा शाल श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे आबासाहेब दळवी, डी.एम. भोसले, डिचोलकर यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सीएस पवार यांनी उपस्थित यांचे स्वागत करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना  आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धापकातील हिताचा विचार करून संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात अनेकांचे हितसंबंध वृद्धापकाळात एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहात. प्रामुख्याने यामध्ये निवृत्त शिक्षक वर्गांचा सहभाग आहे, मी स्वतः एक निवृत्त शिक्षक आहे. पण ज्येष्ठ मंडळींनी संघटित होऊन तालुक्यातील ज्येष्ठांना एकमेकांचा आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे काम असेच सुरू ठेवा. यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील. संघटनेला शासकीय योजना मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे विचार त्यांनी  व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सभासद बेनकट्टी यांनी केले.