निपाणी (प्रतिनिधी) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे प्रा . नामदेव मधाळे लिखित ' डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्ध धर्मावरील गाजलेली व्याख्याने ' या पुस्तकाचे प्रकाशन धामणे (ता.आजरा) येथे राजरत्न आंबेडकर व कागलचे आमदार हस मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माविषयी जी व्याख्याने दिलेली आहेत त्या व्याख्यानांचे संकलन प्रा . मधाळे यांनी केले आहे . या पुस्तकाला राजरत्न आंबेडकर यांनी प्रस्तावना दिली आहे .

पुस्तक प्रकाशनाप्रसंगी राजरत्न आंबेडकर म्हणाले, १९५६ नंतर भारत बौद्धमय करण्याचे डॉ . बाबासाहबांचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात या पुस्तकाचा मोलाचा वाटा आहे . भावी पिढीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून बौद्ध धर्माची तत्वप्रणाली तळागाळापर्यंत झिरपेल असे सांगितले. याप्रसंगी लेखक प्रा.मधाळे यांनी, सामान्यजनांपर्यंत धम्म विचाराचा प्रसार होण्यासाठी आपण या पुस्तकाचे संकलन केल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमास कागल , आजरा , कर्नाटक , महाराष्ट्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.