निपाणी / वार्ताहर 

रस्त्यानजीक उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीनजीक यमगर्णी गावातील स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली. सुनील बोबाटे (४५), सचिन खंदाडे (४१), कलावती बोबाटे (३२), चांदसावा बोगी (५१) आणि अलका बोबाटे (२५) सर्वजण (रा. सातारा) हे जखमी झाले. जखमींवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार जखमी झालेले सर्वजण चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात उपचारासाठी जात होते.  त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची स्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद करिकट्टी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पाच जणांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची नोंद  बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.