नंदगड / वार्ताहर
खानापूर तालुक्यातील भुत्तेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी नंदगड पोलिसांनी दोघांना अटक केली. नागोजी परशराम सुतार (वय ५५) व ओंकार कृष्णा सुतार (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. चौकशी दरम्यान सदर दोघांनी कुणाची कबुली दिली आहे.
शनिवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले होते. नंदगड पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने तपास केला. संशयित आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या जागेवर डोळा होता. सदर जागा त्याला देण्यास लक्ष्मण सुतार विरोध करीत असल्याने शनिवारी ओंकार याच्या साथीने नागोजी ने लक्ष्मण यांचा काटा काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लक्ष्मण यांची पत्नी बाहेरगावी गेल्याची खात्री करून नागोजी आणि ओंकार यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ओंकारने लक्ष्मण यांचे पाय धरून ठेवले तर नागोजी ने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर पुन्हा कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांचा निर्दयपणे खून केला. संशय येऊ नये यासाठी नागोजीने कुणासाठी वापरलेला दगड आणि कुराड इतरत्र फेकून दिली होती. वृद्धाची अशा पद्धतीने निघृण हत्या झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे असतानाच सदर खुणात नागोजीचा सहभाग असण्याची शंका आल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मण आणि नागोजी यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. लक्ष्मण यांनी विरोध करून जागा देण्यास नकार दिल्याने नागोजीच्या मनात राग होता. नागोजी ने संबंधित जागेवर घर बांधण्यासाठी हालचाली चालवल्या होत्या. मात्र नंदगड पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावून दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
0 Comments