चापगाव / वार्ताहर
पिना टाचणी विकण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या एका अज्ञाताकडून भर दिवसा घरफोडीचा प्रकार घडला. चापगाव (ता. खानापूर) येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. पण त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, चापगाव येथील जळगे मार्गावर असलेल्या डॉ. रोशन मनोहर पाटील यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला. गुरुवारी दुपारच्या सुमारास पिना, टाचण्या विकण्याच्या बहाण्याने गावात फिरणारा एक युवक डॉ. रोशन पाटील यांच्या घरासमोर आला. यावेळी त्याने घरात कोण आहे का? घरातील काकू कुठे गेल्या आहेत? सर्वजण दुपारपर्यंत घरी येतील का ? असे प्रश्न विचारले. कुणीतरी डॉक्टरांकडे उपचारासाठी आला असावा या विचाराने डॉक्टर रोशन पाटील यांचे सासरे कल्लाप्पा जिवाई यांनी घरात कोणी नाही सगळे बेळगावला गेले आहेत असे सांगितले. यानंतर तेही गावातील आपल्या घरी निघून गेले.
हीच संधी साधून त्या संशयित चोरट्याने घर परिसरात काही काळ फेऱ्या मारून अंदाज घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याच्यावर कोणताच संशय आला नाही. दुपारनंतर रोशन पाटील आपल्या घरी आले असता, घरासमोरचे गेट व दरवाजाची कडी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने घरातील काही साहित्य इतरत्र पसरले होते. यामध्ये काही महत्त्वाचे साहित्य देखील होते. या या सर्व प्रकारावरून चोरट्याच्या हाती काहीच लागले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रोशन पाटील यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संबंधित चोरट्याचा इतरत्र शोध केला. तसेच शिवाजी चौक येथे असलेल्या एका सुपर मार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, दुपारच्या सुमारास तिथे फिरत असलेल्या संशयितनेच घरफोडी केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. कारण घरासमोर चौकशी केलेल्या त्या संशयीत चोरटेची छबी कॅमेऱ्यात झाली आहे.
सदर संशयित गुरुवारी दुपारच्या सुमारास जळगा मार्गावरून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. तसेच डॉक्टर रोशन पाटील यांचे सासरे कल्लाप्पा जिवाई यांना हे फुटेज दाखवले असता त्यांनी चोरट्याची छबी ओळखली. त्यामुळे या संशयितनेच घरफोडी केल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली आहे.गावात फिरणाऱ्या अशा अनोळखी व्यक्तींपासून नागरिकांनी सतर्क राहावे अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
0 Comments