• महागाव येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे दिले स्पष्ट संकेत 

चंदगड / प्रतिनिधी 

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आमदार राजेश पाटील पक्ष बदलणार, अशी खुमासदार चर्चा रंगली होती पण ती  खोटी असल्याचा निर्वाळा देत पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण रिंगणात येण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी महागाव येथील मेळाव्यात दिले. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे तसेच चंदगडच्या लाल दिव्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही त्यांनी करत आगामी राजकारणाची आपली दिशा स्पष्ट केली आहे. 

आमदार पाटील यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने राष्ट्रवादीचा आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी त्यांनी दिलखुलास भाषण करता आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. मध्यंतरी मेव्हुणे खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राजेश पाटील ही शिंदे गटात जाणार अशा राजकीय वावड्या उठल्या होत्या. पण यावर खुलासा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे काम अजून ताकदीने सुरू केले. अखेर पक्षप्रवेशाच्या वावड्या असल्याचे दिसून आल्यानंतर राजकीय वातावरण शांत झाले. विविध विकासकामात व्यस्त असणाऱ्या आमदार पाटील यांनी नुकताच घेतलेल्या मेळाव्यात आपला भविष्यातील प्रवास उपस्थित कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे मांडला. आगामी विधानसभा निवडणुकीत ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असेही त्यांनी सांगितले.  महाविकास आघाडीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने विविध विकासकामांना स्थगिती दिली आहे.  यावर राग व्यक्त करत अशा मंडळींना बाजूला सांगण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  

खासदारपद नात्यात आणि आपले वडील आमदार असताना आपला जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला, असे असतानाही कार्यकर्त्यांनी आपल्याला आमदार केले आहे. हे ऋण मी विसरणार नाही अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  आमदार पाटील यांनी चंदगड मतदारसंघात लाल दिवा आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी पाठीशी रहावे, असेही आवाहन त्यांनी केले. आई-वडिलांच्या आठवणीने गहिवरलेल्या आमदार पाटील यांनी आगामी वाटचाल स्पष्ट करताना आपण राष्ट्रवादीकडून रिंगणात येणार हे सांगितले. याही पलीकडे राज्यात राष्ट्रवादीची सत्ता येऊन अजितदादा मुख्यमंत्री होतील अशी आशा व्यक्त केली. लाल दिव्याच्या गाडीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी यासाठी या निवडणुकीत सक्रिय  रहावे, असे आवाहन त्यांनी केले.  विरोधकांनी चिमटा काढला तरी त्याकडे दुर्लक्ष करत आपली वाटचाल स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांच्या  मनातील शंकेचे मळभ दूर करत ठाम वाटचाल करत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.