- जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी असलेल्या "अन्नभाग्य" योजनेअंतर्गत सर्वसामान्य गरीब जनतेला १० किलो तांदूळ मोफत देण्यास भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी नकार दिला. याचा जोरदार निषेध करत बेळगाव शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल भव्य मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा दरम्यान काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात तांदळाच्या बुट्ट्या घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या मोर्चात बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते मंडळी सहभागी झाले होते. मोर्चात केंद्र सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले, कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला महत्त्वाकांक्षी "अन्नभाग्य" योजनेंतर्गत १० किलो तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केंद्र सरकारच्या दबावामुळे भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी "अन्नभाग्य" योजनेसाठी १० किलो तांदूळ मोफत देण्यास नकार दिला. जनतेसाठी आम्ही जारी केलेल्या योजनांचा पोटशुळ उठल्याने तांदळाचे वितरण रोखण्यात आले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांची चर्चा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत "अन्नभाग्य" योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कोठूनही तांदूळ उपलब्ध केला जाईल असे आ. राजू सेठ यांनी सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज राज्यभरात जिल्हास्तरावर आंदोलन झाले. यानंतर तालुकास्तरावरही हे आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे जमत नसेल तर जे करताहेत त्यांना तरी करू द्या, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला उद्देशून हाणला. तसेच येत्या १ जुलैपासून आमची अन्नभागीय योजना यशस्वीपणे अंमलात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments