हुक्केरी / वार्ताहर 

ट्रॅक्टर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. हुक्केरी शहराच्या हद्दीत मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातातील जखमींना तात्काळ हुक्केरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे अद्याप प्राप्त होऊ शकलेली नाहीत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, बेळगावहून हारूगेरीकडे निघालेल्या कारची  समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की धडक बसताक्षणीचं कार उलटली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हुक्केरी पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कब्बुरी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची नोंद हुक्केरी पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.