बेळगाव / प्रतिनिधी 

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री व्हावे असे प्रत्येकालाच वाटते मात्र राजकारणात माणसासाठी दूरदृष्टी आणि संयम खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे मी निराश नाही अच्छे दिन येणार आहेत असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केला.

कर्नाटकात सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसने शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी गमावल्यावर लक्ष्मण सवदी यांनी आज प्रथमच प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी ते पुढे म्हणाले राजकारणात कोणीही सज्जन नसतो, तशी प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा असते  अन् आकांक्षांना अंत नसतो, हीच माणसाची नैसर्गिक मानसिकता  असल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्धरामय्या केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणार का या माध्यमांच्या प्रश्नाला त्यांनी याबद्दल सिद्धरामय्या तुम्हाला समर्पक उत्तर देऊ शकतील तेव्हा हा प्रश्न त्यांनाच विचारावा असे ते म्हणाले. सिद्धरामय्या आणि हाय कमांडमध्ये झालेल्या चर्चेबद्दल  मला माहित नाही. उघडपणे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बाहेर अफवा पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस सरकार हमी योजना राबवेल यात शंका नाही, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गाईडलाईन येईल. भाजप याप्रकरणी संभ्रम निर्माण करत आहे. असे मत त्यांनी काँग्रेसच्या गॅरंटी योजनांबाबत बोलताना व्यक्त केले.