- सायंकाळी ६ वा. थंडावणार जाहीर प्रचाराच्या तोफा
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत आज सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वा. संपणार असून जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याने जाहीर सभा, रॅली आणि बैठका घेता येणार नाहीत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली आहे. मात्र मंगळवारी उमेदवारांना घरोघरी प्रचार करता येणार आहे.
आचारसंहितेतील नियमानुसार मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर जाहीर प्रचार थांबवला पाहिजे. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ६ वा. मतदान संपणार असल्याने त्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच आज सोमवारी ६ वा. जाहीर प्रचाराची सांगता होईल. आधी या मुदतीबाबत गोंधळ निर्माण झाला होता रविवारी जाहीर प्रचाराची सांगता होईल असे सांगण्यात आले होते. त्यासाठी मतदानाला सुरुवात होण्याच्या ४८ तास अगोदर अशी गणना करण्यात आली होती. मात्र मतदान संपायच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबवण्याचा नियम आहे. त्या सुधारित नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्याची माहिती दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ जागांसाठी १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्नाटकच्या १६ व्या विधानसभेसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
0 Comments