सुळगा (हिं.) / वार्ताहर

"गुरु ब्रह्मा...गुरु विष्णु...गुरु देवो महेश्वरा... गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै: श्री गुरुवे नमः" कुटुंबाप्रमाणे शाळारुपी ज्ञानमंदिरात शिक्षकांनी लावलेली कडक शिस्त आणि केलेले संस्कार विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवितात. जीवनात शिस्त महत्त्वाची आहे. म्हणूनच 'छडी लागे छम् छम्...विद्या येई घम् घम्...' या उक्तीप्रमाणे हातावर छडीचा मार घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असे उद्गार शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगा (हिं.) चे माजी मुख्याध्यापक आर. एन. हुलजी यांनी काढले. 

रविवारी मण्णूर येथे तब्बल २१ वर्षानंतर ब्रह्मलिंग हायस्कूलच्या सन २००१-०२ बॅचच्या वर्ग मित्र - मैत्रिणींचा स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर सर, सहशिक्षक चौगुले सर, पाटील सर, गुगवाड सर, सरदार झेंडे सर, गोरल सर, खानाजी सर, अनगोळकर टीचर, शिक्षकेतर कर्मचारी परीट आणि कुरणे सर उपस्थित होते.

यावेळी आर. एन. हुलजी पुढे म्हणाले, शिक्षक म्हणून सेवा बजावताना विद्यादान करत विद्यार्थी - विद्यार्थिनींमध्ये असलेले कौशल्य आणि गुण पारखून शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या एसएसएलसी परीक्षेनंतर पुढील भवितव्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच आम्ही घडविलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक,  वैद्यकीय, अभियांत्रिकी यासह विविध क्षेत्रात नोकरी, व्यवसायात नावलौकिक प्राप्त केला असून आज अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनी नोकरी व्यवसायात उच्च पदावर कार्यरत आहेत तर काही यशस्वी उद्योजक बनले आहेत. याच विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित करून दाखविलेल्या सृजनशीलतेमुळे समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी भरमा पाटील आणि राजश्री पाटील यांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.






यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ, गणेश मूर्ती आणि गुलाब पुष्प प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.








- देशसेवा करणाऱ्या युवकांचा सत्कार -

सन २००१-०२ नंतर शालेय शिक्षण होताच भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या माजी विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानाने विद्यार्थी भारावून गेले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चौगुले सर सर म्हणाले, तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढविलेली आणि लग्न करून सासरी पाठवलेली लेक जेव्हा माहेरी येते तेव्हा जन्मदात्या आई - वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या अंतरंगीचे भाव जसे अवर्णनीय असतात, तशीच काहीशी स्थिती विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यामुळे निर्माण झाल्याचे उदाहरण देत उपस्थितांना भावुक केले.

तर गुगवाड सरांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते हे पटवून देताना विद्यार्थ्यांची आपल्या शाळेशी जोडलेली नाळ अजूनही कायम आहे. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून याचे प्रत्यंतर घडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर यांच्यासह सन २००१-०२ सालातील शाळेतील शिक्षकांनी ज्ञानार्जन व शिक्षा या आठवणी बरोबर अनेकांनी मर्मबंधातली ठेव उलगडली. 

सूत्रसंचालन करताना भरमा पाटील यांनी शालेय जीवनातील सर्व विषय आणि शिक्षकांच्या जीवनशैलीवर आधारित कविता सादर करुन रणरणत्या उन्हामध्ये तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण केला अन् भावूक झालेले गंभीर वातावरण थोडे हलकेपुलके झाले.

यावेळी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्र-मैत्रिणींनी फनी गेम्सचा आनंद घेत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.यानंतर शालेय जीवनातील आठवणींची शिदोरी भविष्यात निरंतर आपल्यासमवेत राहावी याकरिता शिक्षकांसमवेत छायाचित्रे आणि सेल्फी टिपण्यात विद्यार्थी दंग झाले होते.

अखेरच्या सत्रात स्नेहभोजनाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली. सुजाता चलवेटकर यांनी आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोख पार पडली. एकंदरीत अचूक नियोजनामुळे हा स्नेहमेळावा  यशस्वीरित्या पार पडला. या स्नेहमेळाव्याला  शाळेचे आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.