दिल्ली दि. १६ मे २०२३

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. नितीन गडकरीच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दोन महिन्यात दोन वेळा फोन धमकीचे फोन आले आणि खंडणी मागितली गेली. या प्रकरणाचा तपास 'राष्ट्रीय तपास यंत्रणा' म्हणजेच 'एनआयए' करणार असल्याची माहिती आहे.
"जयेश पुजारीने दिली होती धमकी"
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने पहिल्यांदा जानेवारी महिन्यात 100 कोटी आणि दुसऱ्यांदा मार्च महिन्यात फोन करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यावेळी जयेश पुजारीने बेळगाव तुरुंगातून फोन केले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्चला जयेश पुजारीला बेळगाव तुरुंगातून अटक करून नागपुरात आणले.
पुजारीचे दहशदवाद्यांशी संबंध: चौकशी दरम्यान जयेश पुजारीचा संबंध दहशतवादी आणि मोठ्या गँगस्टरसोबत असल्याचे तपासात समोर आले होते. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीवर 'युएपीए' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृह खात्याला दिला होता. त्यानंतर केंद्रीय गृह खात्याने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी 'एनआयए'ला देण्यास संमती दिली होती. त्यामुळे 'एनआयए'ची एक चमू नागपुरात येऊन या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे लवकरच हाती घेणार अशीही माहिती होती.
"कोण आहे जयेश कांथा उर्फ पुजारी?"
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला. तो बेळगाव कारागृहात कैद होता. त्याला 2016 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली आहे.
जयेशच्या डायरीत सापडले होते अनेक नंबर: जयेश कांथावर कारागृहातून पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा त्याचा जुना रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा त्याने नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यासाठी धमकीचा फोन केला होता. त्यावेळी नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे एक डायरी सापडली होती. त्यात अनेक 'व्हीआयपी' लोकांचे फोन नंबर असल्याचे तपासात पुढे आले आहे आहे. आज परत गडकरींना धमकी आल्यांने खळबळ उडाली आहे.